पुणे : भारतात पेट्रोल-डिझेलला पर्याय बनू पाहणाऱ्या वाहनांना चांगली मागणी आणि सरकारकडून प्रोत्साहन मिळत आहे. देशात सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांना चांगली डिमांड आहे. आता देशात हायड्रोजनवर चालणारी वाहनं देखील धावताना दिसणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी ‘भारतातील पहिली स्वदेशी (मेड इन इंडिया) हायड्रोजन फ्यूल सेल बेस्ड बस लाँच केली आहे. ही बस वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि KPIT लिमिटेड या खासगी कंपनीने एकत्र येत भारतातच विकसित केली आहे. ही बस आज पुण्यात प्रदर्शित करण्यात आली.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह या बसबद्दल बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हायड्रोजन व्हिजन भारतासाठी आत्मनिर्भर (स्वावलंबी) आणि सुलभ स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी, हवामान बदलाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तसेच नवीन व्यवसाय आणि नोकऱ्या निर्माण करण्यास आपला देश सक्षम होण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.