मुंबई | सायंकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा मार्चअखेर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना मुंबई दौरा करण्यासाठी परत पहाटेच्या विमानसेवेवरच अवलंबून राहावे लागणार आहे. याचा उद्योग, व्यावसायिक, पर्यटकांना मोठा फटका बसेल. त्यामुळे राजकीय नेतेमंडळींनी यासाठी प्रयत्न करावा अशीदेखील मागणी होत आहे.
काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने सायंकाळच्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले. अखेर १ डिसेंबर २०२२ पासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळच्या वेळेस मुंबईसाठी इंडिगो कंपनीमार्फत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत मुंबईसाठी विमान होते.
मात्र, आता मार्चअखेर सायंकाळचे विमान बंद करण्याच्या हालचाली इंडिगोकडून सुरू आहेत. मुंबई विमानतळावर या सेवेसाठी उन्हाळी वेळापत्रकात स्लॉट मिळत नसल्याचे सांगितले जाते.
मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये या विमानाची बुकिंग होत नाही. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवा असावी, यासाठी एअर इंडिया आणि इतर एअरलाईन्सकडे पाठपुरावा सुरू आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.