पुणे । पुणे जिल्ह्याला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. त्यानुसार दिवसभर मुसळधार पाऊस पडला. आता सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पुणे शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या आठवड्यात पाऊस सुरूच राहणार आहे. विशेषतः घाट माथ्यावर पावसाची संततधार सुरु राहणार आहे. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं बंद ठेवण्याचा मोठा निर्णय जिल्हा प्रशानाकडून घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या हौशी पर्यटकांचा बाहेर फिरायला जाण्याचा बेत असेल त्यांना तो रद्द करावा लागणार आहे.
पुणे शहरात गेल्या ३२ वर्षात सर्वाधिक पाऊस हा यावर्षात झाला आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तब्ब्ल ५५६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण, मुळशी, मावळ, सिंहगड, लोणावळा-खंडाळा,भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा अनेक पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी देत असतात. पावसाचा आनंद लुटत असतात. मात्र अशावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून याठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. लोणावळ्यातील सहारा पूल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहिला मिळत आहे. या भागांत असणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मावळ प्रांताधिकारी यांनी 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.त्यामुळे ज्यांचा बाहेर फिरायला जाण्याचा बेत आहे त्यांनी आधी पावसाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.