पुणे | चांदणी चौकातील बहुचर्चित पुल पाडल्यानंतर आता तेथील अतिरीक्त दोन लेनचे काम या आठवड्यात पूर्ण करायचे आणि त्यानंतरच आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक म्हणजे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू करायचे असा निर्णय महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ च्या वतीने घेतला गेला आहे. त्यामुळे या पुलाचे काम आणखी चार दिवस पुढे ढकलले गेले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. ७) रोजी महापालिका-पीएमआरडीए आणि वाहतूक पोलिस यांची एकत्रित बैठक बोलविण्यात आली आहे.
यापुर्वी झालेल्या ‘पुमटा’च्या बैठकीत चांदणी चौक येथील उड्डाणपूल रविवारी पहाटे पाडण्याचा आणि त्यानंतर पुढील आठ दिवसांत अतिरीक्त दोन लेनचे काम पूर्ण करण्याचे, तसेच पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सहा ऑक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम रविवारी पहाटे पूर्ण करण्यात आले. तसेच पुलाचा राडारोडाही हटविण्यात आला; मात्र हा पूल पाडल्यानंतरही सोमवारी पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. त्याच वेळेस विद्यापीठ चौकातही वाहतुकीची कोंडी झाली. चांदणी चौकातील अतिरीक्त दोन लेनचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र हे काम पूर्ण होण्यास हा आठवडा लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता विवेक खरवडकर म्हणाले, ‘पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचे सर्व नियोजन ‘पीएमआरडीए’कडून पूर्ण करण्यात आले आहे. चांदणी चौकात पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून अतिरीक्त दोन लेनचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी ते पूर्ण होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहे. याच कालवधीत विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू केले, तर दोन्ही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास होऊ शकतो. तसेच महापालिकेकडून युटीलिटी शिफ्ट करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. तेथेही डांबरीकरणाचे काम राहिले आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर काम सुरू केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे सहा ऑक्टोबरऐवजी हे काम दहा ऑक्टोबरपासून सुरू करावे, अशी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना केली आहे. तसे केल्यास चांदणी चौकातील अतिरीक्त दोन लेनचे काम पूर्ण होऊन तेथील वाहतूक सुरळीत होईल आणि विद्यापीठ चौकावरही ताण कमी हाईल.’
यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार असून त्यामध्ये चौकात उड्डाणपूलाचे काम कधी सुरू करावे, यावर एकमत करून निर्णय घेण्यात येणार आहे.