राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पुअमरविराम मिळालाय. निवडणुक आयोगात राष्ट्रवादी पक्ष-चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीचा अखेर निकाल लागलाय. निवडणुक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांच्या हाती सोपावलाय. विधीमंडळातील बहुमत लक्षात घेता अजित पवारांकडे असणाऱ्या आमदारांची संख्या शरद पवार गटाच्या आमदारांपेक्षा जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याची माहिती समोर आलीये.
जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले होते. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते. मात्र, आता निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या विरोधात निकाल दिल्यानं शरद पवार गटाकडून या निकालाचा निषेध व्यक्त केला जातोय. मात्र, आता आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आय़ोगाने दिले आहेत.