पुणे | महिला या देवीचे रुप आहेत. समाज सशक्त करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान आणि देवीचीच विविध रुपं असलेल्या महिलांचा माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘यशस्वी नवदुर्गा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टतर्फे गेली सहा वर्षे हा पुरस्कार देऊन समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यावर्षी शिक्षण क्षेत्रातील अंजली तापडिया, मनोरंजन क्षेत्रातील चाहत दलाल, क्रीडा क्षेत्रातील देशना नहार, लाईफटाईम अचिव्हमेंट अर्थात जीवनगौरव पुरस्कार मेधा सामंत, पत्रकारितेसाठी नम्रता फडणीस, समाज माध्यम क्षेत्रातील रचना रानडे, उद्योजिका संजना देसाई, फिलांथ्रोपिस्ट सविता नाईकनवरे, लायन्स क्लबच्या सीमा दाबके आणि शासकीय क्षेत्रातील विनीता साहु यांना यशस्वी नवदुर्गा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, प्रसिद्ध शेफ व ब्लॉगर जुगनु गुप्ता, अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, भारती भंडारी, चेतन भंडारी, लीना भंडारी, रोशनी व गौरव बाफना, शुभम भंडारी, पूर्वी भंडारी, राजेश सांकला, श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया, दिलीप मुनोत, राजेंद्र बाठिया, इंदर छाजेड, मनोज छाजेड, अनिल गेलडा, अशोक भंडारी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महिलांचा सन्मान होण्याची आवश्यकता अधिक असल्याचे सांगून भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कर्तृत्ववान व यशस्वी महिलांचा सन्मान केल्याबद्दल माँ आशापुरा माता ट्रस्ट चे अभिनंदन केले. याबरोबरच यशस्वी झालेल्या महिलांनी त्यांच्या माध्यमातून आणखी यशस्वी महिला घडवाव्यात अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
‘यशस्वी नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या पुरस्कार्थी
अंजली तापडिया
सरस्वतीचे प्रतिक म्हणून शिक्षण श्रेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या अंजली तापडिया या एकल अभियान अंतर्गत वनबंधु परिषदेच्या राष्ट्रीय समितीवर कार्यरत आहेत. व गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्य विस्तारक इत्यादी अभियानाशी त्या जोडल्या आहेत. कोरोना काळात ई संस्कार वाटिकेच्या प्रकल्पप्रमुख, तसेच पालक व बालकांसाठी विनामूल्य समुपदेशन, शेकडो शाळांमध्ये कोमलती फुले आणि सुगंधीत फुले अशी समाजपयोगी व्याख्याने त्या सादर करतात. महेश बालभवन मध्ये ३० वर्षांच्या मुलांचा सर्वांगिण विकास यावर देखील त्या काम पाहतात.
विनीता साहु
समाजाचे रक्षण करण्यासाठी शासकीय सेवेत दुर्गारूपी रूजू असणाऱ्या विनिता साहू यांनी कम्युनिटी पोलिसिंग इनिशटिव्ह्, मोबाईल पोलीस स्टेशन कॅम्प यांच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये पोलिस, गोंदिया मधील सर्व स्त्रियांना सुरक्षा, पुण्यात उडान प्रकल्पांतर्गत तरूणींचे स्वरक्षण अशा संकल्पना राबवल्या आहेत. कोरोना काळात त्यांनी फ्रंट वर्कर म्हणून त्यांनी काम केले. गृह खात्याकडून विनिता साहू यांच्या कामाची दखल घेत अवॉर्ड फॉर एक्सलेन्स इन इन्वेस्टीगेशन सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे.
चाहत दलाल
मनोरंजन क्षेत्रातील चाहत दलाल यांनी अनेक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्या प्रथम भारतीय महिला आहेत ज्यांनी आंतराराष्ट्रीय स्तरावरचे मिसेस गॅलक्सी हे पद पटकावले आहे. त्या वैमानिक असून उद्योगपती, मॉडेल, फिटनेस प्रेमी, प्राणीप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्या देखील आहे.
रचना रानडे
समाज माध्यमावर प्रभुत्व असणाऱ्या रचना रानडे यांनी पहिल्या प्रयत्नात सीए चे शिक्षण पूर्ण केले असून आता युटुबच्या च्या माध्यमातून त्या बिझनेस, ट्रेडींग, स्टॉक मार्केट यांचे प्रशिक्षण तरुणाईला देतात. ७ लाख ६० हजार फॉलोवर्सचा टप्पा त्यांनी अगदी ३ वर्षांत पार केला असून वेबसाईट वर १ लाख विद्यार्थी त्यांच्याकडून मार्केटचे शिक्षण घेतात. समाज माध्यमांचा उपयोग योग्यप्रकारे करून स्टॉक मार्केट मध्ये त्यांनी ७ वेगवेगळे अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठी भाषेमध्ये फायनान्शियल लिटरसी, तसेच हर घर इन्व्हेस्टर यांसारख्या मोहिमा त्या राबवत आहेत.
संजना देसाई
उद्योजक म्हणून संजना देसाई प्रसिद्ध आहेत. देसाई फुडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर संजना देसाई यांचा मदर्स फूड नावाचा ब्रँड आहे. देसाई ब्रदर्स मध्ये इंटर्नशिप पासून त्यांनी केलेली सुरूवात ते आता देसाई बंधूची आंतरराष्ट्रीय बिझनेसची जबाबदारी पाहण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाने १३० टक्क्यांनी भरारी घेतली आहे. निर्यातमधील नफा देखील १२० टक्क्यांनी वाढला आहे.
देशना नहार
क्रीडा क्षेत्रातील देशना नहार हिने वयाच्या ५ वर्षांपासून स्केटिंगचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. वयाच्या ७व्या वर्षी तिच्या नावावर अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. फायटर इंडिया रोलर स्केटिंग या चॅंपियन शिपमध्ये तिला पारितोषक मिळाले. तसेच वर्ल्ड रेकॉर्ड देखील तिच्या नावावर आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल सर्वांकडून तिचे कौतुक करण्यात आले.
सविता नाईकनवरे
जेष्ठांच्या समुपदेशनासाठी, विरंगुळ्यासाठी व आधार देण्यासाठी वय वर्षे ६० वरील जेष्ठांसाठी त्या उर्जा कट्टा चालवतात. आठवड्यातील सहा दिवस ३ ते ६ या वेळेमध्ये डेक्कन जिमखाना याठिकाणी हा कट्टा भरतो. अनेक उपयुक्त उपक्रम यांतर्गत चालवले जातात. गप्पा, गाणी, नृत्य, खेळ, योग साधना, माफक रेजिस्ट्रेशन फी मध्ये डॉक्टरांचा सल्ला, पेंशनर बद्दलची माहिती असे जेष्ठांसाठी उपयुक्त उपक्रम राबवले जातात.
सीमा दाबके
लायन्स क्लबच्या सीमा दबके यांनी तब्बल ३५ वर्षे दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी खर्च केले. दिव्यांगासाठी शिबिरांचे व स्पर्धेचे आयोजन त्या करतात. कर्णबधिर, मुकबधिर, अंध, मतिमंद अशा मुलांसाठी त्या गायनाच्या व नृत्यांच्या स्पर्धेचे आयोजन करतात. २७ वर्षे त्या लायन्स क्लबसोबत कार्यरत असून त्यांनी अनेक समाज कार्ये केली आहेत. समाजसेवा खरोखर आचरणात आणून त्यांनी समाजकल्याणाचे काम आतापर्यंत केले आहे.
नम्रता फडणीस
पत्रकारितेतून समाजप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. आज का आनंद, केसरी आणि आता लोकमत मध्ये जिल्हा परिषद, पर्यावरण, सामाजिक वनीकरण, वनविभाग, साहित्य, नाट्य, चित्रपट, क्राईम आणि कोर्ट या बीट्स मध्ये त्यांनी वार्तांकन केले आहे. पत्रकारितेच्या एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये स्पेशल बातमी, मुलाखती, स्टिंग ऑपरेशन देखील केले आहे.
मेधा सामंत
लाइफटाईम अचिवमेंट हा सन्मान डॉ. मेधा सामंत यांना प्रदान करण्यात आला. त्या अन्नपुर्णा परिवाराच्या चेअरमन असून बॅंकेतील सुखसोयीची नोकरी सोडून त्यांनी समाजकार्याचा वसा हाती घेतला. झोपडपट्टीतील गरिब व अशिक्षित महिलांसाठीच्या सबलीकरणासाठी त्या कार्यरत आहे. पुण्यातील सर्व व मुंबईतील अशा एक हजार झोपडपट्ट्यांसाठी त्या काम पाहतात. गरिबीवर मात करत वित्त, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रात स्त्रियांनी पुढे यावं याकरिता त्या सतत प्रयत्नात आहेत. परदेशातून शिकून आल्यानंतर ही समाजासाठी त्यांची ही ओढ़ कायम आहे. त्याकरिता त्यांना हा लाइफटाईम अचिवमेंट ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.
भोई प्रतिष्ठान
भोई प्रतिष्ठान च्या वतीने नांदेड येथील आर्दापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे काम केले आहे. पतीने आत्महत्या केल्यानंतर ह्या भगिनी जिद्दीने काबाडकष्ट करून स्वकष्टावर उभ्या आहेत. त्या सर्व स्त्रियांचा देखील सन्मान करण्यात आला. एका भगिनीने ९ वर्षांनतर १०वी ची परीक्षा दिली व ती उत्तीर्ण देखील झाली. याकरिता भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई यांनी मार्गदर्शन व साहाय्य केले.
कन्यापूजन व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
याबरोबरच माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टतर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सेंट हिल्डाज शाळेतील मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.