मुंबई | ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप मधून जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याची घोषणा बीसीसीआय कडून नुकतीच केली गेली. मात्र या घोषणेवेळी बुमराहची रिप्लेसमेंट कोण असणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले गेले आहे. यावरून चाहते, माजी क्रिकेटपटू बीसीसीआय आणि निवडसमितीवर सडकून टीका करत आहेत. आता समालोचक आणि माजी सलामीवीर चोप्राने यांनी देखील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
आकाश चोप्राने ट्विट केले आहे की , ‘जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे वेस्ट इंडीज दौरा आणि आशिया कपमधून बाहेर राहिला. जर टी 20 क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी जर जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट असेल तर त्याने आशिया कप खेळणे अत्यंत गरजेचे होते. टीम इंडिया आशिया कपमध्ये तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. याचा परिणाम संघाला भोगावा लागला.’
गोलंदाजीत भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यासारखी गुणवत्ता असलेला दुसरा गोलंदाज नाही. दीपक चाहर आणि मोहम्मद शमी त्याचा पर्याय म्हणून समोर येतात तर शमीच्या फिटनेसबाबत साशंकता अजूनही कायम आहे. चाहर हा भुवनेश्वर टाईप बॉलर आहे. वर्ल्डकपसाठी संघ रवाना होणार असतानाही बीसीसीआयने अजून बुमराहचा पर्याय कोण याचे उत्तर दिलेले नाही.
बॉलिंग कॉम्बिनेशनचा विचार केला तर निवडसमितीने एकूण तीन फिरकीपटूंची निवड केली आहे. यात आर. अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग हे तीन गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार याचा अजून निर्णय झालेला नाही.
.