मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट शिवसेना (Shivsena) हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्हावर निर्णय दिला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thcakeray) यांनी वक्तव्य केले आहे. ‘राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत. पण लोकांमध्ये मनसेबाबत सकारात्मक वातावरण आहे,’ असे ते म्हणाले.
रंगशारदा येथे आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे बोलत होते. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या वादावर फार थेटपणे भाष्य केले नाही. पण त्यांनी त्यांचे मेळावे, भाषणावर टीका केली. ते म्हणाले, ‘राज्यातील जनता सध्याच्या राजकारणाला वैतागली आहे. अनेक लोकांनी दोन्ही दसरा मेळावे पाहिले नाहीत. याउलट मनसेबाबत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे’.
दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी कार्यकर्त्यांना ‘याचा फायदा घ्या. दिवाळीत घरोघरी जाऊन प्रचार करा. सकारात्मक आणि प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला सत्तेत बसवण्याची जबाबदारी माझी. सत्ता आल्यावर मी तुम्हालाच पदावर बसवेन, मी कोणतेही पद घेणार नाही’, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.