मुंबई | शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांची पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र,आता ठाकरे गटाच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने फेटाळला आहे. याबाबतची माहिती मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे सादर केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा आज फेटाळून लावला आहे. त्याबाबत महाडेश्वर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आयुक्तांवर दबाव नेमका कोण टाकतंय हे महाराष्ट्राला, देशातील जनतेला माहिती आहे. आज प्रत्येक गोष्ट जी घडत आहे ती लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र, अद्याप तो मंजूर केलेला नाही. प्रशासन जाणीवपूर्वक ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करत नाही, असा आमचा आरोप असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.
ऋतुजा लटके निवडणूक लढवणारच
महापालिका प्रशासनाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानल जात आहे. मात्र, या परिस्थितीवर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. राजीनामा मंजूर न करणं ही प्रशासनाची मुजोरीगिरी झाली आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. पण आम्ही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देणार आहोत.