मुंबई | शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर (BJP Supports) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले आहे.
शिंदे गट-ठाकरे गटाच्या वादात भाजपकडून अनेकदा विविध वक्तव्ये करण्यात आली आहेत. ठाकरे गटाला टार्गेट करण्यासाठी भाजपकडून एक संधीही सोडली जात नाही. त्यातच आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका केली आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करतात. ज्या-ज्या वेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहित असतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही.’ तसेच उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. ‘राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचं भलं झालं. जे 50 प्रमुख नेते आहेत. तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील, असेही ते म्हणाले.