हैदराबाद | गोव्याच्या दिशेने झेपावलेल्या एका विमानामध्ये अचानक धूर पसरताच या स्पाइस जेटच्या विमानाला हैदराबाद येथे तातडीने लँडिंग करावे लागले.
बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. Q400 Aircraft VT-SQB या विमानामध्ये हा प्रकार घडला आहे. अचानक निघालेल्या धुरामुळे प्रवाशी प्रचंड घाबरले. विमानाच्या कॉकपिट आणि केबिनमध्ये सर्वत्र धूरच धूर झाला होता. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. म्हणूनच रात्री हैदराबाद येथे अचानक विमानाचे लँडिंग करण्यात आले. या धावपळीमध्ये काही प्रवाशांना किरकोळ दुखापती देखील झाल्या आहेत.
मात्र, विमानामध्ये नेमका धूर कसा निघाला? असा प्रश्न उपस्थित होतोय. याची चौकशीदेखील होणार असल्याचं ‘डीजीसीए’ने म्हटलं आहे. रात्रीच्या या घटनेबद्दल काही प्रवाशांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.