लखनौ | सध्या देशात इंधनाचे दर वाढत असल्याने सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. इलेक्ट्रिक कार (Electric Car) खरेदीसाठी आता सरकारकडून तब्बल एक लाखापर्यंत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने (CM Yogi Adityanath) घेतल्याची माहिती दिली जात आहे.
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातच भाजपप्रणित उत्तर प्रदेश सरकारकडून नवी पॉलिसी मंजूर करण्यात आली आहे. या नव्या पॉलिसीनुसार, जर उत्तर प्रदेशात कोणत्याही व्यक्तीने इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर त्या व्यक्तीला मोठी सवलत दिली जाणार आहे. अशा ग्राहकांना एक लाखापर्यंत सूट दिली जाणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने ही योजना 3D बनवली आहे. या पॉलिसीअंतर्गत तीन वेगवेगळ्या टप्प्यात सवलत दिली जाणार आहे. पहिले सरकारकडून नवे वाहन खरेदीसाठी सूट दिली जाईल. दुसरी राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाईल जेणेकरून त्यावरील खर्च कमी होईल. तर तिसरा चार्जिंग स्टेशन किंवा बॅटरी स्वॅपिंग सेंटर स्थापन करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारची मदत केली जाणार आहे.
कारला एक लाख, दुचाकीला 5 हजार तर…
इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या पहिल्या 2 लाख ग्राहकांना प्रत्येकी 5 हजार, तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 हजार ग्राहकाला 12 हजार तर कार खरेदी करणाऱ्या पहिल्या 25 हजार ग्राहकांना एक लाखापर्यंत सवलत दिली जाणार आहे.