नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले होते. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण कोरोनाचा नवा व्हेरियंट भारतात आला असून, आरोग्यतज्ज्ञांनी नवा इशारा दिला आहे. हा ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट BA.5.1.7 असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
भारतासह जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असताना आता ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दिवाळी, भाऊबीजसारख्या सणासुदीच्या कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा पुन्हा अवलंब करावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच जर कोणतेही लक्षण जाणवत असल्यास स्वत:ला आयसोलेट करावे. लसीकरण आणि अँटीबॉडीजने याचा संसर्ग कमी करण्यास मदत होऊ शकेल.
पुढील 2-3 आठवडे महत्त्वाचे
‘नॅशनल टेक्नॉलॉजी अॅडव्हायजर ग्रुप व्हॅक्सिनेशन’चे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे आहेत. कोरोना व्हायरस आपल्या परिसरात असू शकतो. जगभरातही याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सणासुदीला सावधगिरी बाळगावी. या नव्या व्हेरियंटची लक्षणे ही जुन्हा व्हेरियंटसारखीच असल्याने वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.