मुंबई | शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. शिवसेनेतील बहुतांश नेतेमंडळी शिंदे गटात सामिल झाली आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये त्यांनी ‘प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. त्यामुळे लवकरच माझाही गट दिसेल, असे विधान सय्यद यांनी केले आहे.
दीपाली सय्यद एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘सुषमाताई नुकत्याच आल्या असून, त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात’.
दरम्यान, दीपाली सय्यद यांनी जर ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर शिवसेनेला धक्का बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांनी सूचक विधान केले असले तरी नक्की त्या शिंदे गटात जाणार का, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.