मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस नव्या घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे-शिंदे गट वेगळे झाल्यानंतर एकमेकांवर कुरघोडीची एक संधीही सोडली जात नाही. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नवी राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी संजय राठोड यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. देशमुख यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
संजय देशमुख हे माजी मंत्री आहेत. यवतमाळच्या डिग्रजचे दोनवेळा अपक्ष आमदार राहिलेले आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशमुख यांनी संजय राठोड यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 73 हजार मतं मिळाली होती. त्यांच्या या अनुभवाचा फायदा ठाकरे गटाला होईल, असा विश्वास असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना शिवसेनेत प्रवेश दिला. देशमुख यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंकडून त्यांना बळ दिले जाईल, असेही सांगितले.
दरम्यान, संजय राठोड यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्रिपदाचा कार्यभार होता. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, शिवसेनेत फूट फडल्यानंतर संजय राठोड शिंदे गटात सामील झाले आणि त्यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले. आता संजय देशमुख हे संजय राठोड यांना कशाप्रकारे राजकारणात शह देतात हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.