कराड : राज्यात 2014 मध्ये आघाडी सरकारचे काम चांगले होते. मात्र, या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येण्यास राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे.
कराडमध्ये पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, राज्यात 2014 मध्ये आघाडीचे सरकारचे काम चांगले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र, तसे झाले नाही. याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळ्यांना समजले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यात आता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.