मुंबई | सध्या महाराष्ट्रातून चार महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले आहे. त्यामुळे राज्याचे कित्येक कोटीचे नुकसान झाले आहे. याचा रोजगारावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार कमी पडले असा टोला देखील त्यांनी लगावला.
‘राज्यातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. ईडीच्या राज्य सरकारमधील उद्योगमंत्र्यांनी गेलेल्या तिन्ही प्रकल्पाबाबत तीनवेळा विविध प्रकारची वक्तव्य केली आहेत. याचा अर्थ ईडी सरकारमध्ये कुठलाच ताळमेळ नाही. उद्योगमंत्री राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत आहे,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठे प्रकल्प मेरिटवर येत असताना असं काय घडलं, की त्यामुळे तिन्ही प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले. हे सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची गरज नाही, तर या राज्याची एक नागरिक म्हणून मला यातील सत्य जाणून घ्यायचे आहे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
त्याचबरोबर, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नाही. तर राज्यात नवे मोठे उद्योगधंदे येणं व त्यातून रोजगारनिर्मिती होणं हा युवकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यातील जनतेसाठी जबाबदारी आणि उत्तरदायित्व निभावण्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार कमी पडले आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावरून आता विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे असे दिसून येत आहे.