मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय मंडळींकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. त्यात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्याकडून आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर ‘खोके’ घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून राजकारण तापले होते. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी ‘मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. आमची भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आला. त्यानंतर रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे विधान केले होते. मात्र, त्यानंतर बच्चू कडूही त्यांनी दिलेला अल्टिमेटम मागे घेतील, असे वाटले होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. पण आता बच्चू कडू यांनी ‘मी आता माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. राणा यांनी माफी मागितल्याचे मला कळले आहे. त्यामुळे यापुढे वाद नको म्हणून मी देखील माघार घेतो आहे. माझे शब्द मागे घेतो. माझा आत्माच कार्यकर्ता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाही. आमची भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रवी राणा यांच्या खोके’च्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केला जात होते. आता रविवारी झालेल्या भेटीनंतर या वादावर पडदा पडल्याचे म्हटले जात होते. मात्र, अद्याप बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर केली नसल्याने ते उद्या काय भूमिका घेणार याचीच चर्चा सुरु आहे.