फुलगाव | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, पुणे येथील विद्यार्थ्यांशी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी आज संवाद साधला.
थेट न्यायाधीशांशी संवाद साधायला मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद मोठ्या प्रमाणात दिसून आला. तत्पूर्वी, न्यायाधीश संजय देशमुख यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देत स्वागत केले.
विद्यार्थ्यांशी बोलताना न्यायाधीश संजय देशमुख यांनी ‘न्याय’ या शब्दाचा अर्थ सांगून किशोरवयीन मुलांच्या हातून होणारे गुन्हे आणि या वयात होणाऱ्या चुका यावर प्रकाश टाकला. मुलांनी आपली बुद्धी, ताकद व युक्ती या त्रिकुटाचा वापर आपल्या स्वसंरक्षणासाठी करावा, असा कानमंत्रही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच, किशोर वयामध्ये चुका होऊ नयेत म्हणून कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, ॲड. सचिन शिंगणेकर, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ आवचर यांनी केले. तर, आभार प्रदर्शन प्रा.साधना शिंदे यांनी केले.