नवी दिल्ली | भारतात आणि परदेशातील दहशतवादी गँगस्टर्स आणि अंमली पदार्थांची तस्करी यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने एनआयएने (NIA) दिल्लीसह चार राज्यांतील सहाहून अधिक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. गँगस्टर्सशी निगडीत निवासी आणि इतर ठिकाणी देखील एनआयएचे छापे टाकले जात आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील जवळपास २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी दहशतवाद्यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शनही समोर आले आहे. लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क आहेत. लॉरेन्स बिष्णोई आणि बावना गँगच्या नावे भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच एनआयएने आतापर्यंत अटक केलेल्या सर्व गँगस्टर्सच्या चौकशीच्या आधारे पाकिस्तान-आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती जमा केली आहे. देशविरोधी कारवायांसाठी या गँगस्टर्सचा कशाप्रकारे वापर केला जात आहे, याची माहिती तपास यंत्रणा जमा करत आहे. गँगस्टर-दहशतवाद फंडिंग प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा छापे टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, याआधी एनआयएने दोन वेळा कारवाई करत १०२ ठिकाणी छापे टाकले होते.