मुंबई | योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत रामदेवबाबांना खुलासा करण्याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर आता रामदेवबाबा (Ramdev Baba) यांनी त्यांच्या विधानावरून माफी मागितली आहे.
रामदेवबाबा यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रामदेवबाबांना खुलासा मागवणारे पत्र दिले. रामदेवबाबा यांनी दिलेल्या खुलाशाची माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून दिली.
चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती. याबाबत त्यांचा खुलासा कार्यालयाला प्राप्त झाला असून, केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.