गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल आता समोर येत आहेत. यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली असून, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये पूल कोसळून 134 जणांचा मृत्यू झाला होता त्याच मतदारसंघात भाजप आता आघाडीवर आहे.
भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि ‘आप’ने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, सध्याच्या निवडणुकीच्या निकालावरून या दोन्ही पक्षांना यश मिळाले नसल्याचे दिसत आहे. मोरबी पूल दुर्घटना घडली. त्यावेळी सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली जात होती. मात्र, तिथेच आता भाजप आघाडीवर आहे. मोरबी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कांतिलाल शिवलाल यांनी आघाडी घेतली आहे. ते सध्या 16795 मतांनी पुढे आहेत.
भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर
भाजपला गुजरातचा गड राखण्यात यश आले. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा अक्षरश: सुपडासाफ होताना दिसत आहे. भाजप 150 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 19 आणि आम आदमी पक्ष 7 मतदारसंघात आघाडीवर आहे.