बेळगाव | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात सीमाप्रश्नावरून तेढ निर्माण होत आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बेळगावात जाऊन सत्ताधाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. ”मी आज बेळगावातील राणी चन्नमा चौकात जाऊन आलो आहे. पण सत्ताधाऱ्यांनी हे धाडस करून दाखवावे”, असे ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सीमाभागावर वक्तव्य केले होते. त्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला आहे. मात्र, आता रोहित पवार बेळगावात गेले आहेत. ते म्हणाले, ”गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्दावर आरोप-प्रत्यारोप केल्याचे ऐकत आहे. परंतु, बेळगाव हा कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत आहे”. तसेच बेळगावात माझे अनेक नातेवाईक राहतात, यामुळे आमचे बेळगावशी नाते वेगळे आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, यावर राज्यातील काही नेते सीमाभागातून बेळगावला जाणार असल्याचे सांगितल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शरद पवार साहेबांनी अल्टिमेटम दिल्यानंतर वातावरण शांत झाले आहे, असेही ते म्हणाले.