मुंबई | लेखिका अनघा लेलेंना फॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला परंतु आता मात्र हा पुरस्कार राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध करत सरकारवर हल्लाबोल केला.
पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. त्यावरून वाद देखील निर्माण झाला असून साहित्यिकांनी सरकारचा निषेध म्हणून पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
राज्य सरकारने एकूण ३३ पुरस्कार जाहीर केले. लेले यांना फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकासाठी अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला पण पुरस्कार दिल्यांनतर अनेक घडामोडी झाल्या. त्यांनतर सरकारने परिपत्रक काढून पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द केला, असं पवार यांनी सांगितलं.
पुरस्कार रद्द करणे आणि त्यात हस्तक्षेप करणे गैर आहे. साहित्य क्षेत्रातील सरकारचा हस्तक्षेप निषेधार्ह आहे. राजकीय नेत्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करू नये. नवं सरकार आल्यापासून वाद निर्माण होत आहे. लक्ष हटवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. पुरस्कार रद्द करून राज्य सरकारने अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असं पवार म्हणाले.
या पुस्तकाला पुरस्कार देताना पुरस्कार समितीने काही विचार केलाच असेल ना? त्याशिवाय ते पुरस्कार कसे देतील? असा सवाल देखील पवारांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्याचे मंत्री लंगडं समर्थन करतायेत असा खोचक टोला देखील पवारांनी सरकारवर लगावला.