मुंबई | शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर वारकरी सांप्रदायाने निषेध केला. त्यानंतर होत असलेल्या विरोधानंतर सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे. ‘ईडी मागे लावता येत नसल्याने जुने व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
अंधारे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. विश्व वारकरी सेनेच्या वतीने त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला. सेनेचे अध्यक्ष गणेश शेटे यांनी सुषमा अंधारेंची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथच त्यांच्यासह इतरांनी घेतली होती.
त्यानंतर आता अंधारेंनी माफी मागितली आहे. त्या म्हणाल्या, ”सच्च्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. पण भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच बदनामी केली जात असल्याचा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे. कोरोनामुळे जेव्हा मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. तेव्हा या निर्णयाला विरोध करणारा हा तुषार भोसले यांचा कंपू होता, अशी टीकाही त्यांनी केली.