नागपूर | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडांजगी होत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील काहीही चुकीचं बोलले नाही, असे म्हटले आहे.
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘जयंत पाटलांनी काहीही चुकीचं बोललं नाही. निर्लज्ज ही काही शिवी नाही. लाज नसलेल्या माणसाला निर्लज्ज म्हणतात, त्यात काहीही आक्षेपार्ह नाही. गेली चार दिवस मी सभागृहात घसा फुटेपर्यंत ओरडतोय. पण मला अध्यक्षांनी एकदाही बोलू दिलं नाही’.
तसेच आम्ही मुद्यांवर बोलतोय. एनआयटीचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. हा भ्रष्टाचार तुम्ही दडपणार असाल, तर कसं चालेल? हा तुम्ही केलेला भ्रष्टाचार आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी यावेळी केली.