मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसापासून चालू असलेला ठाकरे व शिंदे गट यांच्यातील ‘शिवसेना कुणाची?’ या वादावर शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले की, “शिवसेना ही एकच आहे, एकच होती आणि यापुढेही एकच असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात नेमकं काय होणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. त्याबाबत आयोगाकडे आमची अशी मागणी आहे, की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेऊ नये.”
यावेळेस उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर देखील जोरदार टीका केली. ‘गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे’ असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. “ज्याच्याकडे निवडून आलेले प्रतिनिधी जास्त त्याचाच पक्ष’ हा शिंदे गटाचा दावा हास्यसपद आहे. केवळ निवडून आलेले लोकं पक्ष बनवणार असतील तर, उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना प्रमुख हे पद गोठवले तरीसुद्धा मी पक्षप्रमुख म्हणून कारभार पहातोय. गद्दारांनी हे लक्षात घ्यावं.” अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला लक्ष केले.