पुणे | पूना हॉस्पिटलचे रसिकलाल एम. धारिवाल सेंटर फॉर कार्डिअॅक अँड न्यूरो सायन्समध्ये अद्ययावत कॅथलॅब सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अँजिओग्राफी करण्यासाठी अत्याधुनिक मशिन बसवण्यात आले आहे. ‘फिलिप्स अँरिऑन ७’ हे त्या मशीनचे नाव आहे.
हृदय व रक्त वाहिन्यांची प्रतिमा स्पष्ट दिसत असल्याने हृदय विकार, मस्तिष्क विकार व रक्तवाहिन्यांच्या आजारांचे जागतिक दर्जाच्या या कॅथलॅबमध्ये अचूक निदान होते. यामध्ये डॉक्टरांना देखील या लॅबच्या टचस्क्रिन मोड्युल आणि फ्लेक्स व्हीजन सुविधांमुळे योग्य उपचारासंबंधी त्वरित निर्णय घेणे सोपे जाते.
यातील विविध तंत्रांमुळे हृदयरोग तज्ज्ञांना अँजिओग्रामपेक्षाही पुढे जाऊन बाधित रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणे सुलभ होते. विशेष म्हणजे नेहमीच्या अँजिओग्राफीला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही तपासणी होते.
पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरुषोत्तम लोहिया व विश्वस्त राजेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कॅथलॅब कार्यान्वित झाली. संस्थेने रुग्णांसाठी अत्याधुनिक श्रेणीतील प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करण्याची परंपरा कायम राखली आहे. वाजवी दरात औषधोपचार व दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी पूना हॉस्पिटल कार्यरत आहे, असे जैन यांनी यावेळी सांगितले.