पुणे | दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यवसाय कराबाबत निवेदन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष भेटून याविषयी पाठपुरावा देखील करण्यात आला होता. या प्रयत्नांना अखेर यश आले असून मासिक पगारावर कर कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पूना मर्चंट्स चेंबरच्या निवेदनावर सकारात्मक विचार करुन व्यवसाय करामध्ये महिला व पुरषांसाठी रु. २५०००/- पर्यंतच्या मासिक पगारावर कर कपात करावी लागणार नाही, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी असा भेदभाव न करता सर्वांसाठीच हा निर्णय लागू असेल राज्याच्या अर्थसंकल्पात याचा अंतर्भाव केला जाईल.
भारतातील कोणत्याही राज्यामध्ये अशा प्रकारचा कर घेतला जात नाही. परंतु, महाराष्ट्रातच कर्मचाऱ्यांच्या पगारातून व्यवसाय कर कपात करुन भरावा लागतो. टॅक्सपेक्षा रिटर्न भरण्याचा खर्च जास्त आहे. महसूलाच्या दृष्टीने विचार करता व्यवसाय करामार्फत फारसा महसूल शासनाला मिळत नाही. त्यामुळे प्रोफेशन टॅक्स (व्यवसाय कर) रद्द करण्यात यावा किंवा ज्या अस्थापनेमध्ये १०-१२ एवढेच कर्मचारी आहेत अशा छोट्या संस्थांना करामधून सुट देऊन सर्वसामान्य कर्मचारी यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनामार्फत दि पूना मर्चंटस् चेंबर यांच्यातर्फे करण्यात आली होती, अशी माहिती दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली आहे.