पुणे : जुन्नर तालुक्यातील जुन्नर – आपटाळे महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते वरसुबाई मंदिरापर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बुधवारी 24 ऑगस्ट रोजी माजी आमदार शरद सोनवणे यांनी दुरवस्था झालेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावरील खड्डयांची दुरुस्ती होत नसल्याकारणाने या घटनेच्या निषेधार्थ तिथून ये जा करणाऱ्या नागरिकांना खडीसाखर देत “खड्डे पहा आणि खडीसाखर घेऊन घरी जा !” असा उपक्रम शरद सोनवणे यांनी राबविला.
याच रस्त्यावर निर्माण केलेल्या पादचारी मार्गावर वाढलेली झाडे, तुटलेले व नासदुस केलेले विजेचे आकर्षक दिवे याकडे त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या संकल्पनांची देखभाल देखील होत नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जनतेचा विचार करणे गरजेचे असून ही दुरवस्था एक धोक्याची घंटा असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. एकही अपघात होणार नाही, जीव जाऊ नये यासाठी तातडीने खड्डे भरून घ्यावेत, अशी विनंती त्यांनी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.