फडणवीसांकडून काकडेंच्या ‘मोदी@9’ पुस्तिका वितरण मोहिमेचं कौतुक
पुणे | माजी खासदार संजय काकडे यांनी ‘मोदी@9’ पुस्तिकेच्या ६० हजारांहून अधिक पुस्तिका पुणे लोकसभा मतदार संघात वितरित केल्या होत्या. या मोहिमेच्या अहवालाची एक प्रत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये संजय काकडे यांनी भेट दिली. अहवाल पाहिल्यानंतर फडणवीस यांनी संजय काकडे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
फडणवीस म्हणाले, “संजय तुम्ही या देशातील माझ्या माहितीतील एकमेव माजी खासदार असाल ज्याने ६० हजारांहून अधिक पुस्तिका प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना दिली.”
याविषयी संजय काकडे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदी@9 या पुस्तिकेची मी ६० हजारांहून अधिक छपाई केली होती. आणि पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १० हजारांहून अधिक पुस्तिका मी स्वतः त्या त्या प्रभागातील माझ्या कार्यकर्त्यांसह नागरिकांना दिल्या, त्याचं वाटप केलं. प्रसिद्ध उद्योजक सायरस पूनावाला यांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य माणसाला ‘मोदी@9’ या पुस्तिकेचं मी स्वतः वाटप केलं.”
उद्यानं, मॉल, महाविद्यालये, हॉटेल, मंदिर, मस्जिद, झोपडपट्टी, सोसायट्या, कार्यालये अशा अनेक ठिकाणी जाऊन तिथल्या नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या ९ वर्षांतील महत्वाच्या कामांची माहिती असलेली ही पुस्तिका भेट दिल्याचेही काकडे म्हणाले.