जळगाव | मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या व गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला महत्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी ते उपोषण मागे घ्यायला तयार आहे पण उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती घराण्याचे सातारा गादीचे वंशज उदयनराजे भोसले आणि कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी यावे असं जरांगे पाटील यांचं म्हणनं आहे.
महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षण लागू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मागितला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याचबाबत एकमत झालं. आपण उपोषण मागे घेतलं तरी उपोषणस्थळी आंदोलन सुरुच राहणार, असं जरांगे म्हणाले आहेत.
जरांगे पाटलांच्या पाच अटी काय?
१) सरकारने नेमलेल्या समितीची अहवाल काहीही आला तरी मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावं.
२) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत ते परत घ्यावे.
3) लाठीचार्ज करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं
४) उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी यावं.
५) सरकारच्या वतीने सर्व लिखित स्वरुपात दिले पाहिजे
या पाच प्रमुख अटी मनोज जरांगे यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत.
अटींवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
आज मुख्यमंत्री शासनआपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या अटींवर प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतो. सरकार मराठा आरक्षणावर सरकारात्मक आहे. सर्वपक्षीय बैठकीत देखील मराठा आरक्षणावर चर्चा झालीय. मनोज जरांगे यांची भूमिका समजून घेऊन निर्णय घेतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.