मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. एकीकडे त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी साडेसात वाजता पार पडणार आहे. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर सदस्य आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
‘हे’ नेते राहणार उपस्थित
1) अशोक चव्हाण, काँग्रेस
2) अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता (ठाकरे गट)
3) विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता (काँग्रेस)
4) उदयनराजे भोसले खासदार (भाजप )
5) नाना पटोले, काँग्रेस
6) बाळासाहेब थोरात, काँग्रेस
7) जयंत पाटील, राष्ट्रवादी
8) राजेश टोपे, राष्ट्रवादी
9) चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
10) जयंत पाटील, शेकाप
11) हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी
12) कपिल पाटील, लोकभारती पक्ष
13) विनय कोरे, जनसुराज्य पक्ष
14) महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष
15) बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्ष
16) राजू पाटील, मनसे
17) रवी राणा, आमदार
18) विनोद निकोले, मार्क्सवादी कम्युनिष्पक्ष
19) संभाजी राजे भोसले, माजी खासदार
20) प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
21) सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
22) जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष
23) राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
24) मुख्य सचिव
25) प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग
तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. आज होणाऱ्या बैठकीला मी जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. तो कसा द्यावा हा सरकारचा प्रश्न आहे. बहुमताचे सरकार आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे, असंदेखील वडेट्टीवार यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मेडिकल उपचारांचा त्याग केला आहे. शिवाय ते कालपासून पाणीदेखील पीत नाहीत. सरकारचा दुसरा जीआरदेखील मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावला. महाराष्ट्रातील मराठा समाजाला जात प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण थांबणार नाही अशी त्यांची भूमिका असल्याने यावर सर्वपक्षीय नेत्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे. त्यामुळे यावर काय निर्णय होणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.