मुंबई | नुकतीच निवडणूक आयोगाने राज्यसभेतील ५६ जागा रिक्त होत असून त्यासाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे. या जागा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 15 राज्यांमधल्या आहेत. त्यातल्या ६ जागा महाराष्ट्रातल्या आहेत.
13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्यांचा कार्यकाळ हा 3 एप्रिल रोजी संपणार आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. या सहा जागा कोणत्या ते खालील व्हिडीओमध्ये पाहूयात…
केंद्रातील सरकारचा देखील याच दरम्यान कालावधी संपतोय आणि राज्यसभेच्या या सहा जागांसाठी निवडणूक होईपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असेल.
त्यामुळे आता भाजपाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार का? शिवाय त्याच दरम्यान होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत बेरजेचं राजकारण करण्यासाठी काही मंडळींना राज्यसभेवर पाठवून त्यांची ताकद लोकसभेसाठी घेतली जाण्याची शक्यता अधिक वाटते. त्याबरोबरच ज्यांना येणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात संधी देण्याची व्यूहरचना असेल अशांनाही राज्यसभेवर घेतलं जाईल.
राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे यांचं वलय आणि वजन चांगलंच वाढलंय… नुकतीच त्यांना लोकसभेसाठी सर्वाधिक गुंतागुंतीचं राजकारण असलेल्या बिहारची जबाबदारी दिली. आणि लगेचच नितीश कुमार भाजपासोबत आले. यामध्ये तावडेंचा रोल महत्वाचा मानला जातोय…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत आली तर, महाराष्ट्रातून विनोद तावडे नक्कीच मंत्रिमंडळात असतील. इतका विश्वास त्यांनी मोदी व शाहांचा मिळवला आहे. तावडेंच्या बाबतीत जसं हे गणित आहे. तसंच लोकसभेच्या दृष्टीकोनातून पुणे, मुंबई किंवा उर्वरीत महाराष्ट्रातील ताकदवान नेत्याचा लोकसभा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं. ते नेते कोण असू शकतात हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच.