जळगाव | राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या जूनपासून ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग यांसह जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. नुकतीच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोडो रुपये लागतात. यामुळे सामान्य घरातील मुलगी पैशाअभावी शिकू शकत नव्हती. त्यांच्या घरात आता शिक्षणाची दारं खुली झाली आहेत.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत करावे अशी मागणी केली. यावेळी पाटील यांनी तुमची ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन दिले आहे.