भाजपविरोधात ताकदीनिशी लढू – नाना पटोले
मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या विधानसभा सदस्यत्वासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे ही चर्चा होत असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत चव्हाण यांच्यासह भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.
“काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू,” असा इशारा पटोले यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षातील अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून जात आहे.. नेते अशोक चव्हाण यांनी अद्याप तरी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला नाही परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदल करणे हे तितकच या नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.