मुंबई | नुकताच काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यांनतर पत्रकार परिषद घेत चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केलं? दोन वेळा मुख्यमंत्री, 14-15 वर्ष मंत्रिपद मिळालं, प्रदेश काँग्रेस कमिटीचं सदस्य, आमदारकी, खासदारकी दिली. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली त्यांनी कारण सांगावं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही, असं रमेश चन्नीथला यांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं.
त्यांनी बोलताना, अशोक चव्हाण यांनी सांगायला हवं, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का? त्यांनी कुठलंही कारण पक्ष सोडताना सांगितलं नाही. भाजप वॉशिंग मशीन आहे का? भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये गेले. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळाबद्दल बोलले, मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. ही त्यांची जबाबदारी आहे.
यामुळे आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी बोललो ते सुद्धा आपल्यासोबत आहे. आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असं चेन्नीथला म्हणाले.
नाना पटोले काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांना विशेष महत्व पक्षात दिलं होतं. त्यांना मागच्या रांगेत आता बसावं लागेल, कारण मला तिकडचा चांगला अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांसारख्या वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नेतृत्व करायची त्यांना सवय आहे. त्यांना तिकडे ही संधी मिळणार नाही. अजूनही आम्ही अशोक चव्हाण यांचं स्वागत करू. फडणवीस यांचं झालंय असं दिल्लीचे दोन आका हे सर्वे करतात, त्यात महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जागा आहेत. त्यामुळे हे सगळं करत आहेत. १५ तारखेला आमची बैठक आहे. आमच्याकडे नांदेडसाठी उमेदवार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.