नागपूर | महायुतीचा जागावाटपासंदर्भातील तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. त्यातच आता प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि मित्रपक्षांना इशारा देत महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटपाबाबत विचारणा होत नसल्याने संताप व्यक्त केला आहे.
महायुतीकडून विचारणा झाली नाही तर, लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे शेकडो उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. त्याबरोबरच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हा संभ्रमित करणारा प्रश्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चर्चा झाली तर ठीक नाहीतर आम्ही स्वतः समर्थ आहोत, आम्ही मैदानात उतरू, आम्ही प्रत्येक मतदारसंघात 200 उमेदवार उतरवू असा मोठा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीतील नेत्यांना विशेषतः भाजपला दिला आहे.
विधान परिषदेची, राज्यसभेची निवडणूक असली की तेव्हा फोन करून बच्चू निघाला का? असं विचारलं जातं. हे मी 20 वर्षांपासून अनुभवतोय आणि नाक कसं दाबायचं आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचं हे मला माहीत आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
2 ते 3 हजार उमेदवार असतील
आमचा पक्ष लहान असला तरी सगळ्यात मोठी लिस्ट आमच्या पक्षाच्या उमेदवारांची असेल. बाकीचे पक्ष 400 ते 500 उमेदवार उभे करतील. आमचे 2 हजार ते 3 हजार उमेदवार असतील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
महायुती धर्म पाळणे त्यांचे काम नाही तर मग तोडणे आमचे काम
आम्हाला जागेची विचारणा झाली नाही तर ‘खासदार मोहीम’ राबवू. भाजप आमच्यासोबत चर्चा करत नाही. महायुती धर्म पाळणे हे त्यांचे काम नाही तर मग तोडणे आमचे काम आहे असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजप जागावाटपासाठी लीड करत असल्याने त्यांची लहान पक्षाला विचारण्याची त्यांची जबाबदारी आहे. लहान पक्षांना अशी वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास आहे”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.