पुणे । भाजपाचे नेते राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे हे पुण्यातील बडं प्रस्थ… परंतु, ते सध्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता काकडे यांनी त्यांच्याकडे वेदना व्यक्त केल्या. आयुष्यातील उमेदीची दहा वर्षे पक्षासाठी अनेक कामे केली परंतु, पक्षानं त्यांच्या वेदना आजपर्यंत समजून घेतल्या नाहीत. असं सविस्तरानं चव्हाण यांना सांगताना पुणे लोकसभा मतदार संघातील सद्यस्थितीची माहितीही त्यांनी दिल्याची पोस्ट काकडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केली आहे. माजी खासदार संजय काकडे नाराज आहेत अशी चर्चा होती परंतु, आता त्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केल्यानं त्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलीय…
मुलतः बांधकाम व्यावसायिक असलेले संजय काकडे २०१४ मध्ये कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व नसताना राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यामुळं चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी भाजपाचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारून मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ सुमारे ८० हजार नागरिकांचा सहभाग असलेली देशातली पहिली रॅली याच संजय काकडे यांनी पुण्यात काढली. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकाविण्यात आणि पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात संजय काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी २६ नगरसेवक असलेल्या भाजपाचे पुणे महापालिकेत ९८ नगरसेवक निवडून आले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुण्यातील भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात संजय काकडे यांचा वाटा मोलाचा राहिला.
पक्षासाठी आयुष्यातली उमेदीची १० वर्षे देऊन पक्षाच्या विस्तारासाठी आणि लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करूनदेखील पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याचं सांगत संजय काकडे यांनी नाराजी व्यक्त केलीय. पक्षामध्ये त्यांच्यानंतर आलेल्या अनेकांना पद मिळाली. जबाबदाऱ्या मिळाल्या. परंतु, रिझल्ट देऊनही पक्ष त्याची दखल घेत नसल्याची खंत संजय काकडेंनी व्यक्त केलीय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ते पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यावेळी ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांना पक्षानं संधी दिली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही ते इच्छुक होते. त्यावेळी देखील त्यांना नवीन आश्वासन देण्यात आलं. मार्च २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला त्यावेळी त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल असं वाटत होतं परंतु, अचानक त्यांच्याऐवजी सातारा लोकसभेत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर पाठवलं…
आता २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून लढण्यासाठी ते इच्छुक होते. परंतु, त्यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. २०१४ पासून आजपर्यंत पक्षासाठी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करून कामाचा १०० टक्के रिझल्ट देऊन देखील सातत्यानं पक्षाकडून डावललं गेल्याची सल काकडे यांच्या मनात होती. त्या सर्व वेदना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे व्यक्त केल्या. आता भारतीय जनता पार्टी खरंच संजय काकडे यांच्या वेदनांवर फुंकर घालणार का आणि त्यांना योग्य तो न्याय देणार का हा खरा प्रश्न आहे. याविषयी नजीकच्या काळात काय घडतं हे देखील दिसून येईल…