महायुतीत जाण्याबाबत शिवसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपाला या देशातील लोकशाही संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.पुढे बोलताना, अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांची भाजपा आणि आताची भाजपा पूर्णपणे वेगळी आहे.आजच्या भाजपाने प्रकाश मेहता, विनोद तावडे, पुनम महाजन अशा कितीतरी नेत्यांना बाजूला काढलं आहे. खरं तर वाजपेयी, आडवाणी, प्रमोद महाजन यांची भाजपा विश्वासार्ह होती. मात्र, आताची भाजपा विश्वासार्ह नाही. त्यांना सत्ता आल्यानंतर मित्रपक्ष नको आहे. आजच्या भाजपाला देशातील संविधान बदलायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.२०१४ पूर्वीचं राजकारण वेगळं होतं. आताचं राजकारण वेगळं आहे. आज तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घालता, ते काय जेवता यावरून राजकारण केलं जाते. आज शाळेत, महाविद्यालयात आणि खेळातही राजकारण पोहोचलं आहे. घाणेरड्याप्रकारचं राजकारण सुरू आहे. एक काळ होता, ज्यावेळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे राजकीय वैरी होते. दोघांची भूमिका वेगळी होती. मात्र, त्यांचा विरोध वैयक्तिक कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते.एप्रिल-मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हा शिवसेनेने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २० जागा लढवून १८ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने २४ जागा लढवून २३ जागा जिंकल्या होत्या.पण त्यानंतर काही महिन्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही युती तुटली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं २८२ जागा लढवून ६३ जागा जिंकल्या तर भाजपने २६० जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. भाजपचा हा विजय मोदीलाटेत झाला होता, आता तशी लाट नाही, असा सूर शिवसेनेचा होता.२०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटणं शिवसेनेच्या जिव्हारी लागणारं होतं. पण ही युती तोडताना भाजपला गोल्डन एक्झिट घेता आली नव्हती असं जाणकारांचं मत होतं. २०१९ च्या निवडणुकीत तर परिस्थिती पूर्ण बदलली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडी निर्माण झाली. पुढे २०२२ मध्ये शिवसेनेत बंड होऊन उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट निर्माण झाला. शिवसेना फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने भाजपवर केला. आणि त्यांनतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलून गेली अनेक घडामोडी घडल्या.