दिंडोरी । नरहरी झिरवाळ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नरहरी झिरवाळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मविआ उमेदवार भास्कर भगरे आणि इतर काही नेत्यांच्या शेजारी नरहरी झिरवाळ बसले होते.फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आले. मी अजित पवारांसोबतच आहे.दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत खुलासा केला. नरेंद्र मोदी यांची आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नरहरी झिरवळ यांनी भाषण केलं. यावेळी झिरवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर याबाबतचा सविस्तर खुलासा केला.
झिरवळ म्हणाले, पहिले मी माझा खुलासा करतो. या मंडळींनी माझं कसं केलंय, माझे असे काही जोडीदार आहेत की, याला ना घरका ना घाटका असं करायचा प्रयत्न सुरु आहे. पण मी तसा आज राजकारणात आहे तसं काही नाही. कैलासवासी हरीभाऊ महाले, सीताराम भोईर असतील, झेडएम कानोळे साहेब असतील, कधी हरिशचंद्र साहेबांच्या सोबत किंवा विरोधात असेल, असं करत-करत मी इथपर्यंत आलो आहे. आता मी येताना, मला काय वाटलं होतं, प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल, पंतप्रधान आहेत. आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो, असं नरहरी झिरवळ म्हणाले.उगाच इथे येऊन गर्दी करायची, जो कार्यक्रम आयोजित केलेला असतो त्याच शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची, माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली बसली आहेत. तो प्रोटोकॉल आहे. पण मला वाटलं की, आपणही जरा विचारुन घेऊ. आपलं नाव असेल तर वरती जाऊ नसेल तर आपण खालूनही बाय-बाय करु शकतो. पण पत्रकार मित्र माझ्यामागे काय लागले आहेत ते मला माहिती नाही. खुर्चीवर माझं नाव आहे. म्हणजे तुमच्या मनात येणार नाही. ताईंनी सांगितलं की, त्यांना तिथे आवडेल. मला आवडतं. पण पत्रकार मित्रांनी काय पाहिलं आणि लगेच विचारलं की, तुम्ही काही नाराज आहात का? अरे बाबा मी नाराज कसा?”, असे सवाल नरहरी झिरवळ यांनी केले.
पुढे म्हणाले, मी परवा एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो. वेळ थोडासा मागेपुढे झाला. त्यांची समोरच्यांची प्रचारसभा होती हे मला माहिती नव्हतं. दहा-बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाची पूजा म्हणून मला बोलावलेलं होतं. मला बऱ्याचवेळा असं वाटतं की, पूजेला गेलं तर धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची, प्रसाद घ्यायचं आणि निघायचं. पण मी तसा नाही. मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नाही. मी गेलो, त्यांची सभा शेवटात होती. मी मंडपाच्या बाहेर उभा राहिलो. आता शेट्टे साहेबांसारखे माझे गुरुवर्य, पण ते त्या बाजूला आहेत आणि मी या बाजूला आहे. म्हणून ते हसायचे. ते म्हणायचे की, या मंडपात. म्हणजे शेट्टे साहेब बोलले नाहीत. पण कार्यकर्ते बोलत होते. मी सांगितलं तुमचं आटोपून द्या. मी पूजेला आलोय. त्यांनी पूजेच्या मंडपातच सभा घेऊन टाकली. आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला. त्यानंतर दिवसभर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सगळ्यांचे फोनवर फोन सुरु झाले. तुझं असं झालं काय? मी त्यांना सांगितलं की, अरे आपल्या उमेदवार भारती ताई त्यांना वेळ नाहीय. कारण मी एकदा उमेदवारी करुन पाहिलेली आहे. मी तेव्हा हरलोय. पण उमेदवार काय असतो हे मी अनुभवलेलं आहे.भारती ताईंनी म्हणण्यापेक्षा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात केवळ काम, धोरण, नेता याच्याबरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे. त्यांनी परवा जे केलं ते आपल्याला जमलं नाही. आम्ही परवा साडेअकरा पावणे बारा वाजेपर्यंत आपल्या उमेदवार भारती पवार यांच्याबरोबर होतो. घसा खरडून बोललो, असं काय मला चार तासात झालं की मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो? त्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवलं वाटतं. कारण मी एखादी गोष्ट हो म्हटलो तर परत माघारी जात नाही. असं नरहरी झिरवळ म्हणाले.