लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. आता राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यांतील मतदान बाकी आहे. आणि त्यासाठीही अवघे 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महायुती आणि महाविकासआघाडीनंही पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराचा जोर धरला असल्याचं पहायला मिळतंय. याचदरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपची तगडी फौज मैदानात उतरणार आहे.
मुंबईतील सहा जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपनं दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मोठे नेते मुंबईत विविध ठिकाणी सभा आणि बैठका घेत प्रचार करणार आहे. या नेत्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मुंबईत विविध ठिकाणी सभा आणि बैठका घेणार आहेत. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंतही मुंबई आणि पालघरमध्ये सभा घेणारेत. त्यामुळं पाचव्या टप्प्यासाठी भाजपनं अधिकचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय.
कोणत्या नेत्यांच्या कुठे सभा?
- केंद्रीय मंत्री नारायण राणे- गुरुवारी वडाळ्यात सभा
- केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव- कांदिवलीत जाहीर सभा व उद्योगपती आणि व्यावसायिकांसोबत मॅरेथॉन बैठका
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी- खारमध्ये जाहीर सभा
- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू- चर्चगेट येथे विशेष संपर्क अभियान
- केंद्रीय मंत्री रामदास आठवले- चेंबूरमध्ये जाहीर सभा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- दिंडोरी, कुर्ला व मुलुंडमध्ये जाहीर सभा
- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार- पालघरच्या सातपाटी व दातिवरे येथे दोन सभा
- उद्योगमंत्री उदय सामंत- वाडाळा येथे जाहीर सभा
याशिवाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईच्या मैदानात उतरलेत. बुधवारी नरेंद्र मोदी यांनी घाटकोपर भागात भव्य रोड शो केला. त्यानंतर आता शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात भव्य सभा घेणार आहेत. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपनं मुंबईतील सहा जागांवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईतील 6 जागा आणि तेथील प्रमुख लढती-
1) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव
2) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई
3) उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
4) उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड
5) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील
6) वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर