देशात एकूण सात टप्प्यात मतदान पार पडत आहे आतापर्यंत एकूण चार टप्प्याचं मतदान झालं आहे लवकरच पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे त्यात उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला आहे याचं कारण म्हणजे या लोकसभा मतदारसंघातून वडील आणि मुलगा या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे अध्यक्ष स्वामी प्रसाद मौर्य यांनी आणि त्याचवेळी त्यांचे पुत्र उत्कृष्ट मोर्य यांनी अपक्ष म्हणून या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पिता-पुत्रांनी एकाच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या दोघात लोकसभेच्या जागेसाठी लढत होणार का अशीही चर्चा सुरु झाली होती पण आता दोघांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला याचं कारण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वामी प्रसाद मौर्य हे सुरक्षित रणनीती आखत असणार अशी शक्यता आहे. समजा, जर स्वामी प्रसाद मौर्य यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तर ते आपला मुलगा उत्कृष्ट मौर्य यांच्या बाजूनं मैदानात उतरतील. त्याचबरोबर असंही सांगितलं जातंय की, स्वामी प्रसाद मौर्य कुशीनगरमधून निवडणूक लढणार नाहीत. ते आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी मागेही घेऊ शकतात.
दरम्यान, कुशीनगर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, भाजपचे विजय कुमार दुबे, अपना दल यूनायटेडचे अमिरुद्दीन, राष्ट्रीय शोषित समाज पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य, सपाचे अजय प्रताप सिंह, भारतीय लोकनायक पार्टीचे सुनील कुमार शुक्ल, आझाद अधिकार सेनाचे हरिकेश, भागीदारी पार्टीचे श्याम बिहारी, भारतीय शक्ती चेनता पक्षाचे उमेश सिंह, सुभावती भासपचे वेद प्रकाश मित्र हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
नव्या पक्षाची स्थापना
स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘सपा’तून वेगळं होऊन फेब्रुवारी महिन्यात नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. ते स्वत: कुशीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांचा मुलगा देखील कुशीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात आहे. माहितीनुसार, स्वामी प्रसाद मौर्य आपले पुत्र उत्कृष्ट यांना राजकारणात स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.