मुंबई | उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाने कायम वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना खासदारकीचा मान दिला आहे. राज्यातील आता शेवटच्या पाचव्या टप्प्यात या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. इथं महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा.वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात या दोघांमधील चुरस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघात वेगळीच रंगत आली आहे. विशेषतः चांदीवली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभेनंतर मतदारसंघातील राजकीय चित्र किंचित पलटण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यावरून इथली लढत अटीतटीची होणार? याच संदर्भात जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
उत्तर मध्य मुंबई लोकसभेतील मतदार नव्या चेहऱ्यांना संधी देतो असा इथला इतिहास राहिला आहे. १९९९ मध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी खासदार झाले नंतर २००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी बाजी मारली. २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्याच तिकिटावर प्रिया दत्त या लोकसभेवर निवडून गेल्या आणि पुढे २०१४ आणि २०१९ अशा मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. गेली दोन टर्म भाजपच्या पूनम महाजन इथून लोकसभेवर निवडून गेल्या. मागील निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांना ४,८६,६७२ मते तर प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांना ३,५६,६६७ मते मिळाली होती. १,३०,००५ मतांनी प्रिया दत्त पराभूत झाल्या होत्या. पण यावेळी मात्र भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षाकडून आपला उमेदवार बदलण्यात आला.
आता दोन्ही उमेदवारांचा प्रचार हा अंतिम टप्यात आला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचा अधिक प्रभाव आहे. मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असला तरीपण प्रत्यक्षात फलित मात्र काहीच हाती आलं नाही.
याठिकाणची सद्यस्थिती पाहिली तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना या सहा विधानसभा येतात. विले पार्ले विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पराग अळवणी हे आमदार आहेत. चांदिवलीमध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे आमदार असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. कुर्ल्या मध्ये शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे आमदार आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दिकी आमदार आहेत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते पण फेब्रुवारीमध्ये त्यांनी पिता बाबा सिद्दिकी यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. वांद्रे पश्चिममध्ये भाजपाचे आशिष शेलार आमदार आहेत. कलिना मध्ये शिवसेनेचे संजय पोतनीस आमदार असून ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत. थोडक्यात महायुतीकडे पाच तर महाविकास आघाडीकडे एक आमदार आहेत.
या मतदार संघातील कळीचे मुद्दे कोणते?
लाल बहादूर शास्त्री रोडवरील वाहतूककोंडी आणि अरुंद रस्ते हा इथला प्रमुख मुद्दा आहे. त्याचबरोबर दरडीवरील झोपड्यांचे पुनर्वसन कित्येक वर्षांपासून रखडले आहे. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि फनेल झोनमधील इमारतींचा पुनर्विकासही रखडलेला पाहायला मिळतो. इथला प्रचार आता शिगेला पोहोचला असून कोणाचे मुद्दे अपील होणार? विशेषतः अल्पसंख्यांक मतदारांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार हे 4 जूनला लागणाऱ्या निकालातूनच दिसेल. एकूण १७,२१,१८६ मतदार असलेल्या या लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याचीही उत्सुकता कायम आहे.