दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं.कारण देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ हे उत्तरप्रदेश मध्ये आहेत. लोकसभेच्या ८० जागा या राज्यात आहे. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत हे नेते यूपीतून विजयी होत देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वातील इंडिया आघाडीनं उत्तर प्रदेशात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. असं असताना उत्तरप्रदेश भाजपसाठी किती सोपा किती अवघड जाईल. या व्हिडिओतून पाहू..
उत्तर प्रदेशात २५ हून अधिक जागा अशा आहेत ज्यावर देशाची सत्ता अवलंबून आहे. या जागांवर काही उलटफेर झाला तर २०२४ च्या निवडणुकीतील भाजपाचं राजकीय गणित बिघडू शकतं. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३१ जागा अशा आहेत जिथं २०१९ च्या निवडणुकीत विजय आणि पराभव यांच्यातील अंतर १ लाख अथवा त्याहून कमी मतांचं आहे. या जागा इकडे तिकडे गेल्या तर गणित बिघडेल कारण लोकसभा निवडणुकीत १ लाखाहून कमी मताधिक्य जास्त नसते. यूपीत सध्या इंडियाविरुद्ध एनडीए आणि मायावती यांची बसपा अशी तिरंगी लढत दिसतेय.२०१९ च्या यूपीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ६४ जागा जिंकल्या होत्या तर सपा ५, बसपा १० आणि काँग्रेसनं १ जागेवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीचं विश्लेषण पाहिलं तर ३१ जागांवरील अंतर १ लाख आणि त्याहून कमी होतं. या ३१ जागांपैकी २२ जागांवर भाजपाचा कब्जा आहे. तर ६ जागा बसपा, २ सपा आणि एक जागा अपना दलनं जिंकली होती. जर या जागांवरील मतदारांनी बदलाची भूमिका निभावली तर भाजपासाठी सर्वात जास्त अडचण निर्माण होऊ शकते आणि मायावती यांच्यासाठीही टेन्शनचं ठरू शकते.
मागील लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्य असलेल्या ४ जागा अशा आहेत जिथे १० हजारांहून कमी अंतर पहिल्या २ उमेदवारांमध्ये आहे. ज्यातील २ जागांवर ५ हजारांपेक्षा कमी मताधिक्य आहे. याशिवाय ५ जागा ज्यावर मताधिक्य १० ते २० हजारांमध्ये आहे. लोकसभेच्या ७ जागा अशा आहे ज्यात मताधिक्य २० ते ५० हजारांमध्ये आहे. यासह १५ जागांवर मताधिक्य ५० हजार ते १ लाखांपर्यंत आहे.२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार असलेल्या भाजपाला ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा आघाडी असूनही भाजपाला ६२ जागांवर विजय मिळाला होता. दोन्ही निवडणुकीत भाजपानं त्यांच्या मित्रपक्षाला २-२ जागा दिल्या होत्या. मागील २ निवडणुकीत विरोधी पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. पण यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष रिंगणात उतरला आहे. अखिलेश यादव यांनी मुस्लीम-यादव समीकरण पुढे आणलं आहे. इतकच नाही तर या निवडणुकीत गैर-यादव ओबीसींवर सपा-काँग्रेसची नजर आहे. ज्यातून भाजपाच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडली जाईल असा डाव आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला किती जागा मिळतात त्यावर त्यांच्या अबकी बार ४०० पारचं भवितव्य अवलंबून आहे. २० मे रोजी लोकसभेचा जो पाचवा टप्पा पार पडला त्यात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लढती भाजपसाठी आव्हानात्मक होत्या… निवडणूक आखाड्यात उतरलेल्या इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजपला पाचव्या टप्प्यातील १४ पैकी १० जागावर आव्हान दिलं…पाचव्या टप्प्यातील तीन लढती लक्षवेधी होत्या. रायबरेलीचा क्रमांक यात पहिला आहे. इथं काँग्रेसचे खासदार आणि स्टार प्रचारक राहुल गांधी हे भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात रिंगणात होते. दुसरी सर्वाधिक चर्चेची लढत अमेठीतील झाली..भाजपच्या प्रभावशाली नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात त्यांना भाजपने २०१४ मध्ये उभा केलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांचं नाव झालं होतं. पण पहिल्यावेळी त्यांना राहुल गांधींकडून हार पत्करावी लागली होती. २०१९ च्या निवडणुकीत मात्र स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला आणि अमेठीतून गांधी घराण्याचा खासदार होण्याची परंपरा खंडित झाली.
या विजयाने पक्षातही त्यांचं वजन वाढलं.यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी आईचा पारंपरिक मतदाररसंघ रायबरेलीतून लढण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे स्मृती इराणी यांचा सामना काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा यांच्याशी झाला. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून शर्मा यांना या मतदारसंघाचा परिचय आहे. त्यांनी इराणी यांना चांगली लढत दिल्याचं बोललं जात आहे…तिसरी सर्वांत महत्त्वाची लढत लखनौची होती. तिथं संरक्षण मंत्री राजनाथसिंह रिंगणात होते. ‘यूपी’तील राजधानीत त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांमध्ये राजनाथसिंह यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होतं.आता राहुल गांधी यांच्यात झालेलं परिवर्तन हे ‘इंडिया’ आघाडीला बळ देणारं ठरत आहे. यावेळच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली असल्याने त्यांच्यातील हा बदल काँग्रेससाठी आश्चर्यकारक ठरला आहे. नागरिकांशी निगडित मुद्दे त्यांनी प्रचारात आणल्याचं दिसून आलं..केरळमधील वायनाड व्यतिरिक्त रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयाने राज्यात सुप्तावस्थेत असलेली काँग्रेस सक्रिय झाली.. ‘यूपी’त काँग्रेस ८० पैकी केवळ १७ जागा लढवत आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडीतील समाजवादी पक्षासाठी त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला. राज्यातील कानाकोपऱ्यात, तळागाळात समाजवादी पक्षाची मुळे पोहचलेली आहे. राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या झालेल्या सभांना मिळणारा प्रतिसाद वाऱ्याचा रोख दाखवून देणारा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सत्ताकाळात विविध सरकारी नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पेपर फुटणे आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या घटनांनी राज्यातील तरुणांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे उर्वरित २७ जागांसाठी होणाऱ्या मतदानात याचं प्रतिबिंब उमटणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजपाची गणितं बिघडू शकतात.