लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोल्सवर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसे म्हणाले होते की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. “भारतीय जनता पक्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून उभा केला, त्यांचा हा पक्ष असताना इतराच्या हातामध्ये जाणं आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे. हे जनतेला वाटलं. त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीत फार प्रतिसाद दिसत नाही. तसेच शिवसेना शिंदे गटालाही जास्त प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता करण्याची गरज आहे”, असं खडसे यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानावर बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. भाजपावर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं, असा खोचक सवाल महाजन यांनी खडसेंना केला.एकनाथ खडसे यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करु नका. तुम्ही नेमकं कोणत्या पक्षात आहात आधी ते सांगा आणि मग बोला, खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ४०० पारची घोषणा केली होती. एक्झिट पोलमध्ये जवळपास ३७५ ते ४०० जागा येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आम्ही तो आकडा निश्चितच पार करू, असा विश्वास आम्हाला आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर सर्वांना निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. महाराष्ट्रामध्येही महायुती कुठेही कमी राहणार नाही. महाराष्ट्रात महायुती ३५ जागांचा आकडा पार करेल”, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.दरम्यान, तीस वर्षांहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीत राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी यासंदर्भात एकनाथ खडसे यांनीच याबाबत घोषणा केली. मात्र, त्यानंतर आतापर्यंत एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश झालेला नाही. यावरूनच गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे.मात्र निवडणूक निकालानंतर आपला लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.