पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसह एकुण 70 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 विशेष स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री आणि 35 राज्यमंत्री यांचा समावेश होता. यामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर पुण्याला मंत्रीपद मिलालंय. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडलीये. यानंतर आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळांना टोला लगावलाय. पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुणेकरांना व्हायला हवा, कंत्राटदारांना नाही असा टोला सुळेंनी लगावलाय. राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनी पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी मुरलीधर मोहोळांवर टीका केली.
पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सणसणीत टोला लगावला. विशेष म्हणजे गेले दोन दिवस पुण्यात तुफान पाऊस झाला त्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते तुंबल्याचं चित्र पहायला मिळालं. यावरूनही सुप्रिया सुळएंनी प्रशासनावर ताशेरे ओढले. “पुण्यात प्रशासनच नाही, त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात. मात्र, अशा घटनांनी पुण्याचं नाव खराब होत आहे. पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे. गुन्हेगारीच्या विरोधात राष्ट्रवादीनं रस्त्यावर उतरलं पाहिजे. निकाल लागल्यापासून मी शांत झाले आहे. कारण आता जबाबदारी वाढली. पुण्यातल्या इन्व्हस्टमेट बाहेर जाणार नाही. यासाठी मराठा चेंबर्ससोबत बैठक घेणार, नोकऱ्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार आहे.”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद न मिळाल्याच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळाल नाही? यावर प्रतिक्रिया देताना मैं दुसरो के घर में क्यु झाँकू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकीकडे मोदी शपथ घेत होते आणि दुसरीकडे अटॅक सुरू होता, हे पहिल्यांदा घडलं, जम्मू काश्मीरमध्ये घटना घडली ही अत्यंत दुःखद, सगळ्यांना श्रद्धांजली देते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.