नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी पथमच NDA आघाडीचे सरकार चालवणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर एनडीएतील ७२ खासदारांनी कॅबिनेट / राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका होऊ लागली आहे. ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातला झुकतं माप देण्यात आलं आहे. त्याचबरोबर भाजपाने महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षांवर अन्याय केल्याची टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपाविरोधातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे यांनी म्हटलं आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. तर भाजपाने राज्यात २८ जागा लढवून त्यापैकी त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. आम्ही १५ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा होती की शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळेल. तसेच शिवसेना हा भाजपाचा अतिशय जुना साथीदार आहे त्यामुळे भाजपाने शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, अशी आमची पेक्षा होती. भाजपाने पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि आम्हाला एक राज्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे कुठेतरी आमच्याबरोबर दुजाभाव होतोय असं दिसतंय.भाजपाने दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं, तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिलंय. अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना देखील राज्यमंत्री केलं आहे. पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षालाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. परंतु, सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. तर, एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मंत्रिपद दिलेलं नाही. यावरून विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही खदखद व्यक्त केली आहे.