लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय आणि बड्या नेत्यांविरोधात उमेदवार उतरवण्याची चाचपणी देखील सुरु झाली आहे. यानिमित्तानं चर्चेत येऊ लागला आहे तो वरळी विधानसभा मतदारसंघ.. वरळीतून २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे विजयी झाले होते. आता यावेळी आदित्य ठाकरे हेच वरळीतूनच पुन्हा उभा राहिले तर त्यांच्याविरोधात कोण उभा राहणार ? कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची तयारी सुरु झाली आहे. आणि यात आदित्य ठाकरेंविरोधात संभाव्य नाव समोर आलं आहे ते मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं…संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंसमोर आव्हान उभं करू शकतील का? वरळीतील मतांचं गणित काय सांगतं? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात.
वरळी हा दक्षिण मुंबई लोकसभेतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वरळीमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. आपण सुरुवातीला वरळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात एक नजर टाकुयात
या मतदारसंघात पहिली निवडणूक १९६२ मध्ये झाली…इथं काँग्रेसचे माधव बिरजे निवडून आले.१९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नारायण बिरजेच पुन्हा निवडून आले.१९७२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने शंकर दिघे यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.१९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रल्हाद कुरणे निवडून आले.१९८० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शंकर दिघेंनी पुन्हा बाजी मारली.थोडक्यात १९७८ चा अपवाद वगळता इथं १९८० पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व राहिलं.१९८५ च्या निवडणुकीत विनिता सामंत या अपक्ष निवडून आल्या.
पुढे १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ अशा सलग चार वेळा इथं शिवसेनेने बाजी मारली. शिवसेनेकडून दत्ताजी नलावडे निवडून आले होते.२००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला.राष्ट्रवादीच्या तिकिटावर सचिन अहिर विजयी झाले.२०१४ च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा विजय झाला.यावेळी शिवसेनेकडून सुनील शिंदे निवडून आले.आणि २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंना इथं मैदानात उतरवण्यात आलं. आदित्य ठाकरेंनी ६७,४२७ मतांनी राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंचा पराभव केला आदित्य ठाकरेंना ८९,२४८ मतं मिळाली तर सुरेश मानेंना २१,८२१ मतं मिळाली.
आता राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीकडून पराभवाचे चिंतन होत असताना विधानसभेची रणनीती तयार केली जात आहे. लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. अशात मनसे विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे आव्हान देणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची ही माहिती पुढे येत आहे. तसेच मनसेकडून वरळी विधानसभेत ठीक ठिकाणी बॅनर लावून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी मनसे निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच तयारीला लागल्याचं बोललं जातं. संदीप देशपांडे राज ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मनसेची भूमिका सातत्याने ते सोशल मीडिया आणि समाज माध्यमांतून मांडत असतात. वेगवेगळी आंदोलने करुन ते चर्चेत असतात. दरम्यान वरळीतून निवडणूक लढवण्याबाबत फॉर द पीपल न्यूजनं संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीये. “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून लढण्याची माझी तयारी आहे” अशी सूचक प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी फॉर द पीपल न्यूजशी बोलताना दिलीये.