भारतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वित्झर्लंडमधील स्विस बँकांची चर्चा होत होती. आणि गेली अनेक वर्षे भारतात ही चर्चा होतेय.भारतीय लोकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणावर स्विस बँकेत असल्याचं म्हटलं जातं. अनेक उद्योजक, राजकारणी आपला पैसा या बँकेत जमा करत असतात.पण आता स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे स्विस बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे..पण ही स्विस बँक नेमकी आहे तरी काय? अनेक भारतीय स्विस बँकेतच पैसे का जमा करतात ? आणि आता या बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये मोठी घट का झाली आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
सगळ्यात आधी घेऊयात ही स्विस बँक नेमकी आहे तरी काय?
तर बघा, स्वीस बँक अशा नावाची मुळातच कुठली एक बँक नाहीये. स्वीत्झर्लंड देशात 400 हून अधिक बँका आहेत, ज्यांना स्वीस बँक म्हणतात आणि त्यात UBS आणि क्रेडिट स्वीस या दोन महत्वाच्या बँका आहेत. यातील UBS या बँकेत सगळ्यात जास्त पैसे ठेवले जातात. ती सगळ्यात जास्त फेमस आहे. याच बँकेला जगभरात स्विस बँक म्हणून ओळखलं जातं.
दुसरा प्रश्न जो भारतामध्ये सातत्यानं विचारला जातो तो म्हणजे अनेक भारतीय स्विस बँकेतच पैसे का जमा करतात ? स्वित्झर्लंडमधल्या बँका आपल्या ग्राहकांची आणि त्यांनी जमा केलेल्या पैशाची माहिती अत्यंत गोपनीय ठेवतात. ज्यामुळे लोक त्यांना पहिली पसंती देतात. म्हणूनच जेम्स बाँड किंवा हॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये स्विस बँक आणि त्यांचे कर्मचारी गुप्तपणे वावरताना दिसतात. ते काळा सूट आणि ब्रीफकेसमध्ये लपवलेल्या काँप्युटर डीवाईसमार्फत सगळं काम करताना दाखवलं जातं. स्विस बँका या इतर बँकांप्रमाणेच काम करतात. पण, त्यांच्याबरोबर जोडली गेलेली गोपनीयताच त्यांना खास बँक बनवते. विशेष बाब म्हणजे गेल्या ३०० वर्षांहून अधिक काळ या बँका हे सिक्रेट राखून आहेत. १७१३ मध्ये ग्रेट काऊन्सिल ऑफ जिनिव्हाने बनवलेल्या नियमांनुसार या बँकांना आपल्या ग्राहकांची माहिती घेण्यास सांगितलं गेलं होतं. या नियमांनुसार, ग्राहकांची ही माहिती सिटी काउन्सिल व्यतिरिक्त इतर कोणासही देता येत नाही. स्वित्झर्लंडमधला एखादा बँकर आपल्या ग्राहकाशी निगडीत माहिती इतर कोणास देत असेल तर तो गुन्हा आहे. गोपनीयतेचे हे कडक नियम स्वित्झर्लंडला काळं धन सुरक्षित ठेवण्याचं ठिकाण बनवतात. या बँकेत खातं कसं उघडलं जातं? हे ही आपण जाणून घेऊ..१८ वर्षांहून अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती स्विस बँकेत खातं उघडू शकते. पण, खातं उघडू पाहणारी व्यक्ती एका विशिष्ठ राजकीय हेतूनं किंवा बेकायदेशीररीत्या बँकेत पैसे जमा करू पाहत असेल, तर अशांचा अर्ज बँक रद्द करू शकते. एखाद्या खातेदाराला जर आपली माहिती पूर्णत: गोपनिय ठेवायची असेल, तर तशीही सोय आहे. अशी खाती केवळ नंबरने उघडली जातात. म्हणजे अशा खात्याला खातेदाराचं नावंही नसतं. फक्त एक नंबर दिला जातो, आणि त्यावरूनच ते ऑपरेट होतं. या खात्यासंदर्भात बँकेतल्या बड्या अधिकाऱ्यांनाच माहिती असते. या बॅंकेत खातेदाराचा किमान बॅलन्स UBS च्या वेबसाइटनुसार, सुमारे १ लाख डॉलर किंवा ७५ लाख रुपये पाहिजे. खात्यावर ३०० डॉलर किंवा सुमारे २२ हजार रुपये मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच देखभाल शुल्कदेखील आकारलं जातं. म्हणजे खातं सुरू ठेवण्यासाठी ३०० डॉलर भरावे लागतात.